महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा मराठी माणसाच्या स्वाभिमानी वृत्तीवर भाष्य करणारा चित्रपट. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला आणि मराठी सिनेसृष्टीतील एक मैलाचा दगड ठरला.
एका सामान्य मराठी माणसाच्या आयुष्यामध्ये रोजमररा घडणाऱ्या घटनांपासून या सिनेमाची सुरवात होते. रोज सततचे होणारे अपमान. घरच्यांपासून ते बाहेरच्यापर्यंत सगळेच टोचून बोलणारे. मग अचानक एक दिवशी त्या व्यक्तीच्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवेश होतो आणि ती व्यक्ती हळूहळू आपला आत्मविश्वास परत मिळवू लागते. स्वाभिमानाने जगायला शिकू लागते.
महेश मांजरेकर यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात सचिन खेडेकर यांनी मध्यवर्ती भूमिका केली आहे. त्यांच्या सोबत या सिनेमात सिध्दार्थ जाधव, सुचित्रा बांदेकर, अभिजित केळकर, प्रिया बापट, विद्याधर जोशी हे कलाकार आहेत. प्राईम विडिओ वर हा सिनेमा तुम्ही सहकुटुंब पाहू शकता.