सोनी लिव्हवर तरूणाईला हमखास आवडेल अशी एक वेबसिरीज म्हणजे 'योलो' (YOLO). योलो हा एक शॉर्टफोर्म म्हणून इथे वापरला आहे. याचा संपूर्ण अर्थ होतो 'You only live once'. म्हणजे तुम्ही तुमचे आयुष्य फक्त एकदाच जगता हा आशय असलेली समीर विध्वंस यांनी दिग्दर्शित केलेली ही वेबसिरीज एकूण ९ भागांची आहे.
अगदी छोटे छोटे म्हणता येतील असे १०/१२ मिनिटांचे भाग असलेली ही वेबसिरीज तुम्ही युट्युब वर अगदी मोफत पाहू शकता. छोटे छोटे भाग आणि चटपटीत संवाद असल्याने ही सिरीज कंटाळवाणी होत नाही.
वेबसिरीजची थोडक्यात कथा अशी की चोको म्हणजे मंदार (शिवराज) याचे आजी आजोबा बाहेर गेलेत आणि तो घरात एकटाच आहे. आणि त्यात त्याने घरी मित्राला आणि मैत्रिणीला बोलावले आहे. सोसायटीचा सेक्रेटरी (आनंद इंगळे) हा मंदारच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. मग एक एक घडामोडी घडत जातात आणि त्यामध्ये मंदार आणि त्याच्या फ्रेंड्सची त्रेधातिरपीट उडत जाते. ते सगळं नेमकं काय काय घडतं ते तुम्ही वेबसिरीज पाहत पाहत अनुभवू शकता.
या वेबसिरीज मध्ये आनंद इंगळे, सई ताम्हणकर, शिवराज वैचाल, ऋतुराज शिंदे, नागेश भोसले, शाश्वती पिंपळकर, शिवानी हे कलाकार आहेत.
या वेबसिरीज मध्ये थोडे प्रौढ संवाद आणि दृश्य असल्याने लहान मुलांसोबत ही सिरीज पाहणे टाळा.