मराठी सिनेमा, नाटक आणि टेलिव्हिजन वरील मालिका या मधील एक नावाजलेल्या दिग्दर्शकापैकी एक नाव म्हणजे सतीश राजवाडे. या सगळ्या क्षेत्रात काम केल्यानंतर सतीश राजवाडे आता वेबसरीज मध्ये देखील उतरले आहेत. एम एक्स प्लेअरवर त्यांनी दिग्दर्शित केलेली एक वेबसरीज आहे ती म्हणजे 'समांतर'. दुनियादारी कादंबरी फेम सुहास शिरवळकर यांनी लिहलेली 'समांतर' या कादंबरीवर आधारित ही वेबसरीज आहे.
ही मालिका कुमार महाजन (स्वप्नील जोशी) या व्यक्तिरेखेच्या अवती भोवती फिरते. आयुष्यात त्रासलेला कुमार आपल्या मित्राच्या सांगण्यावरून हात पाहून भविष्य सांगणाऱ्या स्वामींना (जयंत सावरकर) भेटायला जातो. त्याचा या सगळ्या गोष्टीवर विश्वास नसतो. पण जेव्हा स्वामी सांगतात की मी हा असाच हात ३३ वर्षांपूर्वी पहिला आहे. सुदर्शन चक्रपाणी याचा. आणि ते कुमार ला त्याच्या भूतकाळातील काही गोष्टी अचूक सांगतात. आपल्या आयुष्यात पुढे काय होणार या उत्सुकतेने तो पछाडतो.तेव्हा मग एक पाठलाग सुरू होतो. कुमार त्या सुदर्शन चक्रपाणी या व्यक्तीला शोधू लागतो.
या पाठलागावर आधारित हे कथानक आहे. स्वप्नील जोशी सोबत या मालिकेत महाभारत या दूरदर्शनवर अत्यंत लोकप्रिय मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका केलेलं नितीश भारद्वाज (सुदर्शन चक्रपाणी) आणि कुमार च्या पत्नीच्या भूमिकेत तेजस्विनी पंडित आहे.
ही वेबसरीज एकूण ९ भागांची आहे. सध्या तरी या वेबसरीजचा दुसरा सीजन लवकरच प्रदर्शित होणार आहे. सतीश राजवाडे यांनी समांतरच्या शेवटच्या भागात तसे संकेत दिलेच होते.
लवकरच समांतरचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी आशा आहे. आणि त्यामध्ये काय काय दाखवलं असेल याची रसिकप्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता असेल यात शंका नाही.